गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये रंगले ‘युवा संसद’

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये आज संविधान दिनाच्या निमित्ताने युथ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना भारतीय संसदीय प्रणालीची ओळख करून देणे आणि त्यांच्यात लोकशाही मूल्ये रुजविणे होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेचे प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांनी संविधान दिनाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांनी लोकसभेच्या सत्राचे यथार्थ सादरीकरण केले, ज्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, खासदार, तसेच सभापतींच्या भूमिकांमध्ये त्यांनी स्वतःला सादर केले.सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय व सामाजिक विषयांवर चर्चा केली आणि ठराव मांडले. महिलांचे सक्षमीकरण, शैक्षणिक सुधारणा, आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका मांडल्या. युथ पार्लमेंटला उपस्थित असणार्‍या सर्व शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना संविधानाचे मूल्य समजून घेण्याचे आवाहन केले.शाळेच्या व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले. युथ पार्लमेंटसारखा उपक्रम प्राचार्य सौं. नीलिमा चौधरी यांच्या प्रेरणे मुळे साध्य झाला व तो साध्य करण्यासाठी स्कूलचे शिक्षक विजय पाटील व तुषार मेढे यांनी योगदान दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व लोकशाही प्रक्रियेबद्दल समज विकसित झाली. युथ पार्लमेंट हा एक प्रेरणादायी अनुभव ठरला, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.युथ पार्लमेंटमुळे विद्यार्थी अधिक जबाबदार नागरिक होण्याच्या दिशेने प्रेरित होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

Protected Content