बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू !

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज रोजी होत असलेल्या मतदानाच्या दिवशी बाळसाहेब शिंदे हे मतदान केंद्राचा आढावा घेत होते. यासाठीच ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. मात्र या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना बीड शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संदीप क्षीरसागर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने योगेश क्षीरसागर हे तगडे उमेदवार मैदानात आहेत. या व्यतिरिक्त डॉ. ज्योती मेटे या देखील या निवडणुकीत आव्हान देत आहेत. याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून बाळासाहेब शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Protected Content