जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाहनात अवैधरित्या गॅस रिफिलींग करतांना गॅस सिलींडरचा स्फोटात ११ जण भाजल्याची घटना ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी घडली होती. यामध्ये गंभीर असलेल्या चौघांचा मृत्यू झाला होता, तर सात जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या संजय गणेश तेरवडीया (रा. गणेश पेठ, पुणे) यांचा बुधवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे गॅस रिफिलींग स्फोटातील मृतांची संख्या ही पाचवर पोहचली. मात्र अद्याप देखील जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेण्यात आलेली नाही.
पुणे येथील संजय तेरवडीया (दालवाले) हे पत्नी व मुलगीसह जळगावात राहत असलेल्या भरत दालवाले यांच्याकडे आले होते. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी निघाले. शहरातील ईच्छा देवी पोलीस चौकी शेजारी गॅस रिफिलींग सेंटरवर वाहनात गॅस भरण्यासाठी थांबले. वाहनात गॅस रिफिलींग करतांना सिलींडरचा स्फोट होवून ११ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये वाहनात बसलेल्या सात जणांसह गॅस भरणारा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. तर संजय तेरवडीया यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा व मुलगी रेश्मा मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले असून त्याठिकाणी उपचार सुरु आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास संजय तेरवडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना संजय तेरवडीया यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर गरुवारी त्यांच्या अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.