फैजपूर, निलेश पाटील |
रावेर, यावलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे एकमेव नेते म्हणजे स्व. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी… त्यांचा जन्म १६ जून १९२८ रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ गाव खिरोदा (ता.रावेर) हे असून त्यांचे शिक्षण वर्धा येथील गो.से कॉमर्स महाविद्यालयातून एम.कॉम.पर्यंत झाले होते. स्व.बाळासाहेबांनी १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळीत बालपणीच सहभाग घेतला होता.
त्यांना १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत मा. यशवंतराव चव्हाण यांनी आग्रहाने उमेदवारी दिली आणि ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर त्यांना पाटबंधारे व विज विभागाचे उपमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. बाळासाहेब सलग पाचवेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. मात्र १९८० साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी लागलीच आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर तब्बल १० वर्षे ते राजकारणापासून अलिप्त राहिले. १९९० ते ९५ याकाळात सहाव्यांदा ते विधानसभेवर निवडून आले आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. कॉंग्रेस सरकारच्या काळात महसूलमंत्री, नगरविकास खात्याचे राज्यमंत्री, अर्थ, अल्पबचत व नियोजन मंत्री, शिक्षण व बांधकाम मंत्री अशी वेगवेगळी मंत्रीपदे त्यांनी आपल्या कारकिर्दीत भूषवली, मात्र त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्यासाठी अनेक ठोस कामे केली. तापी नदीचे ६६ टक्के पाणी महाराष्ट्राला मिळवून देवून परिसर सुजलाम सुफलाम करण्यात त्यांचा मोठा वाट होता. ‘सुश्रुषा’ या सहकारी हॉस्पिटलची दादर येथे त्यांनी निर्मिती केली. शिक्षणमंत्री असतांना महाराष्ट्रासाठी एकच शिक्षण मंडळ असले पाहिजे, हे त्यांचे ध्येय होते आणि ते त्यांनी साध्य केले. आज ते माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे आहे. त्यानंतर शिक्षकांसाठी सेवाशाश्वती, सुधारित पगार, बँकेतून पगार व निवृत्तीवेतन ही योजना त्यांच्याच कार्यकाळात मंजूर झाली. महत्वाचे म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी श्वेतपत्रिका काढली. वनप्रशिक्षण केंद्राची पाल, जालना, शहापूर व चंद्रपूर येथे स्थापना केली. अशी अनेक कामे त्यांनी महाराष्ट्रासाठी त्यांच्या कार्यकाळात केली.
जळगाव जिल्ह्यासाठीही स्व. बाळासाहेबांनी अनेक जनहिताची कामे केली. जिल्हा कसा सुजलाम सुफलाम राहील, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी वाटचाल केली. सर्वात आधी पाण्याच्या प्रश्न कसा सुटेल ? याकडे लक्ष केंद्रित केले. हतनूर, वाघुर, सुकी, मोर, आभोडा, मंगरूळ, लोहारा, मात्राण, गंगापुरी, हिवरा, अंजनी, बहुळा, सूर, कालाडोह, बोरी, भोकरबारी, अंजनी, शहापूर, या धरणांची निर्मिती करून हा भाग पाण्याखाली आणला. त्यानंतर आपल्या भागातील बेरोजगारांना काम मिळावे म्हणून त्यांनी जिल्ह्यात तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. फैजपूर येथील मधुकर साखर कारखाना, कासोदा येथील वसंत कारखाना व चाळीसगावचा बेलगंगा हे तीन महत्वाचे प्रकल्प उभारले. यात फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना अडचणींवर मात करीत गेली ४२ वर्षे सुरु आहे. याठिकाणी आज एक हजाराच्या जवळपास कामगार काम करीत आहेत. त्यांनीच जळगाव येथे सहकारी दुध संघाचीही स्थापना केली. जळगावात क्रीडा संकुल उभारले, दीपनगर येथे वीज केंद्र प्रकल्प सुरु केला. शासकीय तंत्रनिकेतनची उभारणी केली. महत्वाचे म्हणजे उत्तर महारष्ट्र विद्यापीठाच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. १९८४ साली भोरगाव लेवा पंचायतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले, अशी अनेक कामे त्यांनी जिल्ह्यासाठी केली.
महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्यापैकी एक संस्था फैजपूर येथे तापी परिसर विद्या मंडळाच्या नावाने सध्या कार्यरत असून त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे. अशा विविध कामांमुळे त्यांची राज्यात लोकसेवक म्हणून ओळख निर्माण झाली. खान्देशच्या या लोकनेत्याची दि.८ जुलै रोजी नववी पुण्यतिथी आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यलायात त्यानिमित्त दुपारी १२.०० वाजता त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार आहे.
बाळासाहेबांनी घेतलेला लोकसेवेचा वसा त्यांचे सुपुत्र शिरीष चौधरी सध्या समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनीही आमदार असताना यावल व रावेर तालुक्यात अनेक जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यामुळे आज हा भाग सुजलाम सुफलाम झालेला दिसत आहे. स्व. बाळासाहेब चौधरी यांना पुण्यतिथीनिमित्त ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’तर्फे विनम्र अभिवादन !