बोदवड- पंकज कपले । मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान याबाबत अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्याशी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.