यावल-अय्यूब पटेल | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात बहुरंगी मुकाबला रंगणार असून यात कोण बाजी मारणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या पंचवार्षिकमध्ये रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिरीषदादा चौधरी यांनी प्रतिनिधीत्व केले असून यंदा त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र धनंजयभाऊ चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी सर्वात आधी तयारी देखील सुरू केली आहे. कृतज्ञता संवाद दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. मतदारांशी त्यांनी थेट संवाद साधला आहे. दरम्यान, मतदारसंघातील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी देखील तयारी सुरू केली आहे.
दुसरीकडे प्रहार जनशक्तीच्या तिकिटावर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे उमेदवारी करणार असून त्यांनी देखील आधीपासून तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच वंचित बहुजन आधाडीकडून पक्षाच्या जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांना पहिल्याच यादीत उमेदवारी मिळाली असून त्यांची देखील जोरदार तयारी सुरू आहे. यासोबत अन्य काही उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अर्थात, यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघात बहुरंगी मुकाबला होणार आहे. प्रमुख सामना हा भाजप व काँग्रेसमध्ये असला तरी देखील प्रहार ज नशक्ती व वंचितच्या उमेदवारांचा देखील तगडा दावा आहे. यात कोण बाजी मारणार ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.