कर्नाटकातील राजीनामा दिलेले आमदार मुंबईतल्या हॉटेलमध्ये दाखल ; भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता

Karnataka mla

 

बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या असून काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यापैकी ११ आमदारांची मुंबईतील एका आलिशान हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून काँग्रेस त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.

 

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता असते. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार होते. तर जेडीएसकडे 37 आमदार होते. तसेच त्यांच्याकडे बसपाच्या एका आमदाराचा पाठिंबादेखील आहे. तिन्ही मिळून 118 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला आहे. सर्व राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले, तर ही संख्या 102 होईल. तर दुसऱ्या बाजुला भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदार आहेत. तसेच एका अपक्षाच्या पाठिंबादेखील आहे. त्यामुळे 106 आमदारांच्या संख्याबळावर भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.

 

दरम्यान,मंगळवारी विधानसभेत या आमदारांच्या राजीनाम्यावर विचार करण्यात येणार असून त्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार राहणार की कोसळणार हे निश्चित होणार आहे. या १३ही आमदारांचे मन वळवण्यासाठी काँग्रेस जंग जंग पछाडत आहे. यातील ११ आमदारांची मुंबईतील एका आलिशान हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Protected Content