नोकरीला लावण्याच्या मोबदल्यात घेतली २ लाखांची लाच; शाळा संस्थेच्या सचिवाला रंगेहात पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिपाईच्या रिक्तपदावर तक्रारदार यांच्या भाच्याला नोकरीला लावण्याच्या मोबदल्यात १० लाखांची मागणी करत पहिला हप्ता म्हणून २ लाखांची रक्कम स्विकारतांना संस्थेचे सचिवाला राहत्या घरी शिवकॉलनी येथे जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सापळा रचून रंगेहात पकडले आहे. विनोद मधुकर चौधरी वय ५३ रा. शिवकॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संस्थेच्या सचिवाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा मुलगा हा धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेच्या २० टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सन २०२१ पासून शिपाई रिक्तपदावर नोकरीस होता. नोकरील लावण्यासाठी संस्थेचे सचिव विनोद चौधरी याने ७ लाख ७० हजार रूपयांची लाच घेतली होती. त्यानंतर सचिव विनोद चौधरी याने तक्रारदार यांच्या मुलाचे वय सन २०१२ पासून फरक काढण्यासाठी कमी असल्याचे सांगून त्याला कामावरून कमी केले. व सदरची जागा ही सन २०१२ पासून रिक्तपद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा याला शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी व शासनाकडून मंजूरी आणून देण्यासाठी सचिव विनोद चौधरी याने तक्रारदार यांच्याकडे १० लाखांची मागणी केली. यापुर्वी स्विकारलेले ७ लाखा ७० हजाररूपये विसरून जा असे सांगून आताच्या कामासाठी १० लाखांपैकी महिला हप्ता म्हणून २ लाखांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली. पथकाना पळताळणीसाठी गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सचिव विनोद चौधरी यांच्या शिवकॉलनी येथील राहत्या घराजवळ सापळा रचून २ लाखांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content