यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील शेळगाव बँरेजसाठी अंजाळे गावातील शेतकरी बांधवाची शेतजमीन पाटबंधारे विभागाने संपादित केली होती. या संपादीत केलेल्या जमिनीचा मोबादला शेतकऱ्यांना ३० जुलै पर्यंत मिळणार आहे.
शेळगाव बँरेजसाठी शासनाने अंजाळे, पाडळसा आणि पिळोदे या गावातील शेतकऱ्यांची जमिन भूसंपादित केली होती, पण याचा मोबदला अजून पर्यंत शेतकऱ्यांना दिलेला नव्हता. या शेतजमिनाचा योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी अंजाळे गाव आणि परिसरातील शेतकरी बांधवांकडुन अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
आज आ. हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली फैजपूर प्रांताधिकारी डॉं. अजित थोरबोले यांच्याकडे सबंधित शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला लवकरात लवकर देण्याच्या सुचना हरिभाऊ जावळे यांनी दिल्या. चर्चेअंती येत्या ३० जुलैला शेतकऱ्यांना सुमारे ४६ कोटी रुपये सोबत २०१८ पासून त्यावरचे व्याज देण्यात येईल, असे प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केले. बऱ्याच दिवसांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण होणार असल्याने शेतकऱ्यानी आनंद व्यक्त करून आ. जावळे यांचे आभार मानले आहेत.
याप्रसंगी अंजाळे उपसरपंच धनराज सपकाळे, ग्रा.पं. सदस्य युवा मोर्चा सरचिटणीस योगेश साळुंखे, शाखाप्रमुख माजी ग्रा.प. सदस्य कैलास सपकाळे, त्र्यंबक सपकाळे, ग्रा.प. सदस्य रवी सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, योगेश सपकाळे, नारायण सपकाळे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.