ईव्हीएम हॅक करणे अशक्य- निवडणूक आयोग

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच ईव्हीएमसंदर्भात निवडणूक आयोगाने भाष्य केले आहे. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. दरम्यान, इस्रायल जर लेबनॉनमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी हिजबुल्ला पेजर हॅक करू शकतो, तर ईव्हीएम हॅक करता येणार नाही का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, पेजर कनेक्टेड असतो. ईव्हीएम नाही. ईव्हीएमशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.

ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. राजीव कुमार म्हणाले, आम्ही ईव्हीएमवरील सर्व २० तक्रारींना व्यक्तिगतपणे वस्तुस्थितीनुसार उत्तर देऊ. ईव्हीएमची संपूर्ण यंत्रणा सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. तसेच, प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचे एजंट हजर असतात. ईव्हीएममध्ये बॅटरी टाकल्यावर त्यावर एजंटची सहीही असते.

मतदानाच्या ५ ते ६ दिवस आधी चिन्ह लावली जातात. मशीन तसेच बॅटरीवरही एजंटची सही असते आणि ती सील केलेली असते, असे राजीव कुमार यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएमशी छेडछाड शक्य नाही. ते म्हणाले, ईव्हीएमबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हॅकिंग होऊ शकते, इथले मतदान तिकडे जाऊ शकते, असे आधी म्हटले जात होते. मात्र, आता पुढे काय म्हटले जाणार, याचाही विचार आम्ही करत आहोत, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

Protected Content