भुसावळ, प्रतिनिधी | तालुका शिवसेनेतर्फे पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मदतीने जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेला ‘ऑप्शन फॉर्म’ भरून घेण्यासाठीचे मोफत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सदर केंद्र शिवसेना प्रमुखांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वातील समाजकारणाचा भाग म्हणून सुरू करण्यात आल्याचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी भुसावळ विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख विश्राम साळवी, रावेर विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख मोहन मसुरकर, जामनेर विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख श्रीकांत पाटील हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते, त्यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रावर ऑप्शन फॉर्म भरून घेण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून या मोफत सुविधेचा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका शिवसेनेने केले आहे.
सदर केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे वरणगाव शहरप्रमुख रवींद्र सुतार, भुसावळ शहरप्रमुख नीलेश महाजन, विभागप्रमुख पंकज पाटील, विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरडकर उपस्थित होते. या केंद्रावर विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी तसेच ऑप्शन फॉर्म भरून घेण्यासाठी कल्पेश चौधरी व मोहित पाटील परिश्रम घेत आहेत. यावेळी मान्यवरांनी केंद्राला शुभेच्छा दिल्या तसेच शिवसैनिकांचे अभिनंदन केले. सदरचे केंद्र सकाळी ८.०० वाजेपासून सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत सुरु राहणार असून विद्यार्थ्यांना मोफत सहकार्य केले जाईल, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.