वाराणसी, वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी वाराणसीत भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली. यावेळी पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्याचवेळी या अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर शंका घेणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. काही लोक भारतीयांच्या सामर्थ्यावर शंका उपस्थित करीत आहेत. ते लोक घोर निराशावादी आहेत, अशा लोकांपासून सावध राहायला हवं, असा मंत्रही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
काय म्हणाले मोदी ? :-
-देश विकसित होण्याची वाट आता पाहू शकत नाही. आता स्वप्ने आणि शक्यतांवर चर्चा होईल. आम्ही ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करू.
-आम्ही देशाची अर्थव्यवस्था दुप्पट करू. मी अर्थशास्त्री नाही. पण ज्या लक्ष्याबाबत बोलत आहे, त्यावर तुम्हाला विचार करणे भाग पडेल हेच खरंय. नवीन लक्ष्य, नव्या स्वप्नांना घेऊन पुढे जाऊ. हाच मुक्तीचा मार्ग आहे.
-आम्ही अर्थव्यवस्था वाढवण्याचा संकल्प सोडलाय. कुटुंबाचे उत्पन्न जेवढे जास्त, त्यानुसार सदस्यांचे उत्पन्नही अधिक असेल.
-भारत आता अधिक वेळ वाट पाहू शकत नाही. आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि हे लक्ष्य गाठणेही कठीण नाही.
-काही लोक भारतीयांच्या सामर्थ्यावर शंका उपस्थित करताहेत. भारतासाठी हे लक्ष्य गाठणे महाकठीण आहे असे ते म्हणतात. ते लोक निराशावादी आहेत, त्यांच्यापासून सावध राहायला हवे.
-प्रत्येकाचे उत्पन्न वाढले तर खरेदी क्षमता वाढते. मागणी वाढते. उत्पादन क्षमता वाढते. रोजगाराची नवी संधी उपलब्ध होते.
-आपल्या मनात कुठे ना कुठे गरिबी हा अभिमानाचा विषय झाला आहे. गरिबी ही एक मानसिक अवस्था झालीये. ती दूर करायचा प्रयत्न करायला नको का ?
-स्वच्छ भारत, घरोघरी शौचालय आणि वीज पोहोचल्यानंतर आता घरोघरी पाणी या योजनेवर काम करणार आहोत. पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा ते वाचवणं अधिक गरजेचं आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच अंमलबजावणीला सुरुवात होईल.