प्रथमच उत्तर गडचिरोली माओवाद्यांपासून मुक्त – मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली असून माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले आहे. प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. त्यामुळे या भागात भीती आणि दहशतीवर मात केली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील बैठकीत सांगितले.

देशाची राजधानी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावित क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे. सशस्त्र माओवादी कॅडरची संख्या २०१३ मध्ये ५५० होती, ती २०२४ मध्ये अवघी ५६ झाली आहे. गेल्या सहा वर्षात ९६ सशस्त्र माओवादी मारले गेले, १६१ पकडले गेले आणि ७० जणांनी आत्मसमर्पण केले असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने आमच्या सरकारच्या कार्यकाळात मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या माओवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. या कार्यकाळात एकाही व्यक्तीची माओवादी संघटनांमध्ये नव्याने भरती झालेली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही. माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड परिसरातील एकूण १९ गावांनी माओवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. हे आमच्या विकास धोरणाचे मोठे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content