नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘जय श्रीराम’ या घोषणेचे बंगाली संस्कृतीशी काहीही संबंध नाही, असे सांगत ‘जय श्रीराम’ घोषणेचा वापर केवळ लोकांना मारहाण करण्यासाठीच केला जात असल्याची टीका नोबल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केली आहे.
‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. यापूर्वी याबद्दल कधी ऐकले नव्हते. मी एकदा माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझी आवडती देवी कोणती आहे? असा सवाल केला होता. त्यावर तिने माँ दुर्गा असल्याचे उत्तर दिले. माँ दुर्गाचे पश्चिम बंगालमध्ये प्रचंड महत्त्व आहे. त्याची तुलना रामनवमीशी केली जाऊ शकत नाही. माँ दुर्गा आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, असे सांगतानाच लोकांवर हल्ले करण्यासाठीच ‘जय श्रीराम’च्या घोषणेचा आधार घेतला जात असल्याचेही ते म्हणाले. देशाच्या काही भागांमध्ये लोकांवर जय श्री रामचा नारा देण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचे प्रकार घडले असून नकार देणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर अमर्त्य सेन यांनी हे विधान केले आहे.