जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकडी येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंतची ही सहावी शेतकरी आत्महत्या आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार असे की, वाकडी येथील अभिमन मांगो सोन्ने (वय ५५) यांनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या जामनेर रस्त्यावरील शेतात जाऊन विष प्राशन केले. याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी सोन्ने यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. परंतु सोन्ने यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगितले. त्यानुसार सोन्ने यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, कर्जबाजारीपणाला कंटाळून सोन्ने यांनी आत्महत्या केली असून त्यांच्यावर खाजगी सावकारी व सोसायटीचे कर्ज होते. सोन्ने यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याचे वडील हे अनेक दिवसापासून कर्जाच्या विवंचनेमुळे अस्वस्थ होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर शून्य क्रमांकाने पहूर पोलीस स्टेशनला खबर वर्ग करण्यात आली आहे.