धरणगावात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत तरूणांना नियुक्ती पत्र वाटप

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवकांच्या हाताला काम देऊन त्याला प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार आहे. युवकांना या प्रशिक्षण काळात मिळणारा अनुभव हा त्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यास मदत करणारा ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्या सहकार्याने दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आयोजित ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप व रोजगार मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती आवारात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थीमधून पंचायत समितीला 208, तहसील कार्यालयात 48, सार्वजनिक बांधकाम विभागात 06, शिक्षण विभागात 91, नगरपालिका – 09, अर्बन बँक 12 या ठिकाणी 6 महिन्याकरिता प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आलेल्या अशा एकूण 274 प्रशिक्षणार्थीना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी ज्या ज्या कंपन्यांना प्रशिक्षणार्थी दिले जाणार आहेत त्या आस्थापनांची स्टॉल्स उभारण्यात आली होती, त्या सर्व स्टॉलची पाहणी पालकमंत्री यांनी केली. तसेच संबंधित स्टॉल्सवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या युवकांशी त्यांनी संवादही साधला.

औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते. ही गरज ओळखून राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कार्य प्रशिक्षण दिले जाते. ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होणार आहे. जिल्ह्यातील विविध 12 कंपन्यांमध्ये एकूण 584 रिक्त जागी बेरोजगार युवकांना प्रशिक्षणार्थीं म्हणून पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते . पंचायत समितीच्या आवारात मेळाव्याच्या ठिकाणी जैन इरिगेशन, बांभोरी (250), हिताची कंपनी बांभोरी (200), कृ.ऊ.बा. समिती (04), जोगेश्वरी जिनिंग (07), मोहरीर कॉटन भोद खु. (07), एम आय डी सी मधील आशिष व तषविता इलेक्ट्रिकल्स (05), बियाणी , शारदा व विन्ले पोलीमर्स (11), स्टार फेब्रीकेटर्स (06), स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज (04) या कंपन्यांमध्ये एकूण 584 जागा रिक्त आहे. यात आलेल्या युवकांमधून सुमारे 300 युवक व युवती पात्र झाले आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कौशल्य विकास विभागाचे कनिष्ठ अधिकारी मिलिंद देशपांडे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची’ माहिती, रोजगार मेळाव्याचा उद्देश तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया आदींबाबत सविस्तर माहिती विषद केली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मंजुषा अडावतकर यांनी केले तर आभार कार्यक्रमाच्या आयोजक दर्शन इन्स्टिट्यूटच्या संचालिका पौर्णिमा भाटिया यांनी मानले.

या नियुक्ती वाटप व उद्घाटन समारंभास तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर. आर. डोंगरे, आय. टी. आय. चे प्राचार्य नवनीत चव्हाण, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता एस. डी. पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास पाटील यांच्यासह माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, जिजाबराव पाटील , दिलीप महाजन, निर्दोष पवार, चंदन पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, संजय चौधरी, पप्पू भावे ,वाल्मिक पाटील, वासुदेव चौधरी दर्शन इन्स्टिट्यूटच्या संचलिका पौर्णिमा भटिया, समीर भटिया तसेच शासकीय विभागात निवड केलेले प्रशिक्षणार्थी यांच्यासह मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी 10 वी, 12 वी, पदवीधर तसेच उच्चशिक्षित युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content