स्थानिकांच्या विरोधामुळे धारावी पुनर्विकासचे भूमिपूजन अखेर रद्द

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘धारावी रिडेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ने (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने गुरुवारी भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र धारावी बचाव आंदोलनाने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. धारावी बचाव आंदोलनाने भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. धारावीकर बुधवारी सकाळपासून माटुंगा लेबर कॅम्प येथे लाक्षणिक उपोषणास बसले होते. डीआरपीपीएलने अखेर गुरुवारचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला.

रावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्वसाधारण आराखडा आणि पायाभूत सुविधांसाठीचा असा दोन टप्प्यातील आराखडा तयार झाला आहे. मात्र अद्याप या आराखड्यास राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे धारावीतील सर्वेक्षण, तसेच पात्रता निश्चिती पूर्ण झालेली नाही. मार्च २०२५ मध्ये पात्रता निश्चिती पूर्ण होणार आहे. त्याचवेळी धारावीकरांच्या अनेक मागण्या असून त्या मागण्यांवर अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. असे असताना डीआरपीपीएलने अचानक धारावी पुनर्विकासाच्या भूमिपूजनाचा घाट कसा घातला, असा सवाल करीत धारावीकर आक्रमक झाले आहेत.

माटुंगा लेबर कॅम्प येथील आरपीएफ मैदानावर गुरुवारी सकाळी १० वाजता भूमिपूजनाचा औपचारिक छोटेखानी सोहळा होणार असल्याची माहिती समोर येत होती. याची कोणतीही अधिकृत घोषणा राज्य सरकार वा डीआरपीपीएलकडून करण्यात आली नव्हती. डीआरपीपीएलकडून प्रसारमाध्यमांनाही याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती. धारावी बचाव आंदोलनाने भूमिपूजन सोहळा उधळून लावण्याचा इशारा देत बुधवारी सकाळी लाक्षणिक उपोषण सुरू केले. धारावीकरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे डीआरपीपीएलने गुरुवारचा भूमिपूजन कार्यक्रम रद्द केल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी दिली.

दरम्यान, भूमिपूजन कार्यक्रम रद्द झाल्याने धारावी बचाव आंदोलनाने आपले लाक्षणिक उपोषण मागे घेतले. धारावी बचाव आंदोलनाच्या लाक्षणिक उपोषणास स्थानिक खासदार अनिल देसाई यांनी पाठिंबा दिला. तसेच ते उपोषण स्थळी उपस्थित होते. धारावीकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर डीआरपीपीएलने माघार घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी यावेळी दिला.

Protected Content