दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयसीयू अर्थात अतीदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू असल्याचं पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
सीताराम येचुरी यांना सोमवारी ताप, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांना रुगणालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात हलवल्याचे वृत्त पीटीआयनं पक्षाच्या निवेदनाच्या हवाल्याने दिले आहे. हिंदुस्तान टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सीताराम येचुरी यांना न्यूमोनियाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.