घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार चोरट्यांना अटक; रावेर पोलीसांची कारवाई

जळगाव/रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना रावेर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरी करण्याचे साहित्य, सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण ७८ हजार ३६० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरात प्रवीण सिताराम महाजन (वय ३४) यांचे बंद घर फोडून शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना घरफोडी करणारे चोरटे हे रावेर व सावदा रस्त्यावरून जात असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गैबन शहा बाबांच्या दर्ग्याच्या टेकडीखाली सापळा रचून गोलूसिंग नशीबसिंग पटवा (वय २०, रा.बडवणी जिल्हा) आणि सुनीलसिंग केवलसिंग बरनाल (वय २६, रा.धार जि मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली आहे. याप्रकरणी दोघांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरी करण्याचे साहित्य, चोरी करण्याचे साहित्य, चांदीचे पैंजण असा एकुण ७८ हजार ३६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, घनश्याम तांबे, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, सुकेश तडवी, विकारोद्दिन शेख, अमोल जाधव, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांनी केली आहे.

Protected Content