मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील नागरीकांना रेषनकार्ड संदर्भात येत असलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शिवसेनचे तालुकाप्रमुख छोटु भोई यांनी आज शिवसैनिकांसह मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन दिले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेषनकार्ड धारकांना शासनामार्फत अनेक सुविधा पुरविण्यात येतात. यामध्ये स्वस्त धान्यापासून ते आरोग्यापर्यंतच्या अनेक सुविधा आहेत. त्याचप्रमाणे याआधी पिवळे व केशरी अशा सर्व शिधापत्रीका धारकांना शासनामार्फत वेगवेगळ्या दराने स्वस्त दरात धान्य मिळत होते. परंतु अशा योजनेमध्ये शासनाने बदल करुन प्रधान मंत्री अन्न सुरक्षा योजना ही योजना सुरू केली. मात्र, अशी योजना करत असतांना या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम व या योजनेत शिधापत्रीका धारकांना समाविष्ट करण्याचे काम आयोग्य पध्दतीने करण्यात आले. त्यामुळे अनेक गरीब व गरजूंना या योजनेत सामाविष्ट करण्याऐवजी वगळण्यात आले. त्यामुळे अनेक लोकांनी या योजनेत सामाविष्ट होणेसाठी तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचेकडे अनेक वेळा अर्ज केले आहेत. परंतू त्यांच्या अर्जावर कुठलीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही.
दुसरीकडे ज्या नागरीकांकडे रेषनकार्डच नाही किंवा ज्यांचे कार्ड आॅनलाईन नाही अश्या लोकांना सुध्दा अनेक अर्ज करुनही मुक्ताईनगर तहसीलदार कार्यालयात सतत फेऱ्या माराव्या लागत आहेत.तसेच सध्या शिधापत्रीका धारकांना ई.पाॅस मशीनद्वारे स्वस्त धान्य पुरवठा केला जातो. परंतु आॅनलाईन च्या नावाखाली मशीन मध्ये “थम्” येत नसल्याने किंवा आधारकार्ड “अपडेट” नसल्याने गरीब व गरजवंत शिधापत्रीका धारकांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेता येत नाही. अनेक गरीब व गरजवंत कुटुंबांचा उदर्निर्वाह तसेच आरोग्यापर्यंतचा प्रश्न रेषनकार्डाद्वारे सोडविला जातो. म्हणून समाजातील गरजवंत व गरीब प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या या अनेक योजनांचा लाभ घेता यावा, म्हणून तात्काळ या सर्व अडचणी सोडवून दुर करण्यात याव्यात, ही मागणी निवेदन देवून करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, शहरप्रमुख प्रशांत टोंगे, शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, प्रमोद भारंबे, नितीन चव्हाण, मनोज मराठे, योगेश पाटील, चंद्रकांत मराठे यांसह शिवसैनिक उपस्थित होते.