पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव द्या; मुरलीधर मोहोळांची मागणी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि या विषयावर सविस्तर चर्चा केली. अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज २६ ऑगस्ट रोजी सोमवारी दिली आहे.

मोहोळ म्हणाले, आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहे.विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते, म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मी मांडली आहे.

पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचे नाते जिव्हाळ्याचे होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे. असे यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Protected Content