अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील सरकारी शाळेतील एका ४७ वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. प्रमोद मनोहर सरदार असे या शिक्षकाचे नाव आहे. सहा शाळकरी विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आणि त्यांचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले व शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमधून चार महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
अकोलाचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सांगितले की, पीडित मुलींचे जबाब नोंदवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पीडित मुलींनी टोल फ्री क्रमांकाद्वारे बालकल्याण समितीशी संपर्क साधल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर समितीच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी शाळेला भेट देऊन मुलींशी संवाद साधला. त्यानंतर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.