पुणे पोर्श अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोन जणांना अटक

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी अल्पवयीन मुलाचे वडील व बिल्डर विशाल अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी मोठी मदत केल्याचे उघड झाले आहे. या दोघांच्या माध्यमातून अगरवाल याने ससूनमधील डॉ. अजय तावरेसही संपर्क साधून रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचे आढळले आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य अविनाश सूद, आशिष सतीश मित्तल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या पूर्वी या प्रकरणी बिल्डर विशाल अगरवाल, मुलाची आई शिवानी अगरवाल, ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात असून आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल याने ससूनमधील डॉ. तावरेशी संपर्क साधला. त्यासाठी मकानदार, गायकवाड यांच्या माध्यमातून चार लाखांची रक्कम देण्यात आली होती. अगरवालचे परिचित आदित्य सूद, आशिष मित्तल यांची डाॅ. तावरेशी ओळख होती. त्यांच्या माध्यमातून अगरवालने डॉ. तावरेशी संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेकडून सोमवारी रात्री उशीरा सूद आणि मित्तल यांना अटक करण्यात आली. दोघांना अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Protected Content