सुभाष महाराजांनी देणगी देऊन उभारली भानखेडे झेडपी शाळेची संरक्षण भिंत

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भानखेडा येथे सन 2020 मध्ये संरक्षण भिंत झालेली होती. परंतु शाळेच्या खोलीची पश्चिम दिशेची भिंत हनुमान मंदिराला लागून असल्याने भिंतीचे बांधकाम करता आले नव्हते. यानंतर सन 2022 मध्ये बांधकामासाठी तीन वर्ग खोल्या निर्लक्षित कराव्या लागल्या. त्यामुळे पश्चिमेकडील हनुमान मंदिराकडची बाजू पूर्णपणे मोकळी झाली होती. सदर ठिकाणी जुन्या इमारतीची एक जीर्ण भिंत असल्यामुळे ते मुलांसाठी धोकेदायक ठरलेली होती. ती भिंत बांधून मिळण्यासाठी शाळेने ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु निधी अभावी ही भिंत बांधणे शक्य नव्हते.

ही बाब सुज्ञ पालक सुभाष महाराज यांच्या कानावर पडली आणि त्यांनी ही भिंत स्वखर्चाने उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी तब्बल एक लाख रुपये देणगी जाहीर केली. परंतु सुभाष महाराज यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना धावपळ करणे शक्य नव्हते. अशावेळी सुभाष महाराज यांच्या मदतीला धावून आले गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप मतकर. दिलीप मतकर यांनी सुद्धा आपला 20 हजार रुपये इतका वाटा त्यामध्ये टाकला. आणि भिंत उभारण्याची सर्व जबाबदारी आनंदाने स्वीकारली. सदर बांधकामासाठी उत्तम प्रतीची नंदुरबार रेती, विटा, खडी, सिमेंट बघता बघता शाळेमध्ये दाखल झाले. आणि फक्त दहा दिवसांमध्ये 53 फूट लांब आणि 8 फुट उंच अशी संरक्षण भिंत पूर्ण झाली. संरक्षण भिंतीच्या वर चार फुटाची जाळी सुद्धा बसवण्यात आली. या संरक्षण भिंतीचे लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनी दिलीप मतकर आणि सुभाष महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.

सुभाष महाराज यांचे दोन जुळे नातू अजय महेश इंगळे आणि अभय महेश इंगळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानखेडा येथे इयत्ता तिसरीच्या सेमी वर्गामध्ये शिकत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यावर सुद्धा त्यांनी आपल्या नातवांचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला.आणि त्यांनी ठरवलं की , मी माझ्या नातवांसाठी दरवर्षी 50 हजार रुपये इंग्लिश मीडियम मध्ये शिकवण्यासाठी खर्च केले असते. ती रक्कम मी माझ्या गावातील शाळेला देईल आणि माझे नातू आपल्या गावातील मराठी शाळेतच शिकवेन. माझी गावची शाळा सुद्धा सुंदर होईल आणि माझ्या नातवांना सुद्धा अतिशय दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण मिळेल. आतापर्यंत सुभाष महाराज यांनी दरवर्षी शाळेला अनेक भेटवस्तू दिलेल्या आहेत. त्यामध्ये कम्प्युटर टेबल, गॅस शेगडी , शालेय पोषण आहार साठी पातेले, अभ्यासक्रमाचा पेन ड्राईव्ह या वस्तू भेट दिल्या आहेत. शालेय पोषण आहार संपलेला असताना मुलांना विविध फळे त्यांनी खाऊ घातले.

शाळेच्या तीन खोल्या निर्लेखित होऊन एका खोलीचे बांधकाम सुरू असताना विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी जागा नव्हती तेव्हा त्यांनी आपल्या श्री संत गजानन महाराज मंदिर भानखेडा येथे स्वखर्चाने कनाती आणून दोन वर्ग खोल्या शिक्षकांना तयार करून दिल्या आणि तिथे तब्बल सात महिने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. तेथील शौचालय , पाण्याची सुविधा , फॅन ,डिजिटल शिक्षणासाठी आपल्या घरातील एलईडी टीव्ही आधी सर्व सुविधा त्यांनी अतिशय आनंदाने आणि सेवा भावनेने उपलब्ध करून दिल्या. आणि आता 15 ऑगस्ट 2024 रोजी एक लाख रुपये देणगीतून उभारलेलली संरक्षण भिंत लोकार्पण केली. अशा या ध्येयवेड्या पालकाला मानाचा मुजरा . असे पालक जर प्रत्येक गावामध्ये असतील तर जिल्हा परिषदेच्या शाळांना अतिशय चांगले दिवस येतील अशी आशा वाटते.

Protected Content