भोंगळ कारभार ! अर्ज न करताही लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून ओवाळणी मिळाल्याने उत्साहाला पारावार उरला नाही. पण दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम एका पुरुषाच्या खात्यात जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्रे दिली, तरी ती रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वातंत्र्यदिनाला दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले असल्याचे मेसेज मोबाईलवर येत आहेत. अशातच यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील जाफर गफ्फार शेख यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणामुळे योजनेतील भोंगळ कारभार समोर आला आहे.

जाफर शेख सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नसताना त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले. खात्यात जमा झालेली रक्कम पाहून तो चक्रावून गेला. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणताही अर्ज न करता एका पुरुषाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Protected Content