कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणूक इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून न लढण्याचा निर्णय माजी वस्त्रोद्योग मंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांनी आज जाहीर केला. मात्र याचवेळी त्यांनी या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. यापूर्वी दोन वेळा लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केलेले राहुल आवाडे आता यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात ताराराणी पक्षांच्या झेंड्याखाली उतरतील हे स्पष्ट झाले आहे.
प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षामध्ये तीस वर्षांहून अधिक काळ काँग्रेसचे राजकारण केले. त्यांचे वडील माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा सांगत प्रकाश आवाडे हे १९८५ साली प्रथम आमदार झाले. त्यानंतर ते पाच वेळा आमदार बनले. त्यांना तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे.
गेल्या निवडणुकीच्या आधी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रकाश आवाडे यांनी विधानसभेची निवडणूक ताराराणी पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर आवाडे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दर्शवला. सध्या ते भाजपचे समर्थक असले तरी आगामी विधानसभा निवडणूक ताराराणी पक्षाच्या वतीने अपक्ष म्हणून लढवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर आता विधानसभा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे त्यांनी स्वतःच घोषित करत घराण्याच्या राजकीय वारशाची सूत्रे कनिष्ठ पुत्र राहुल आवाडे यांच्याकडे सोपवली आहेत.