अंजनी नदीपात्रात २ वर्षीय चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील दोन वर्षीय चिमुकल्याचा गावातील स्मशानभूमीजवळील अंजनी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनू सुरेश बारेला वय-२, रा. सबखेडा ता. धरणगाव असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.

धरणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील दिलीप पाटील यांच्या खळ्यात सोनू बारेला हा चिमुकला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील काही शेतकरी हे शेतात जात असतांना सतखेडा गावातील स्मशानभूमी जवळील अंजली नदीपात्रामध्ये सोनू बारेला या चिमुकल्याचा पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी तातडीने धाव घेत त्याला धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. हा चिमुकला पाण्यात कसा गेला ? याबाबत कोणतीही माहिती अजून मिळाली नाही. यासंदर्भात दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

Protected Content