वाढत्या गुन्हयांमुळे यावल बसस्थानकावर पोलिस पथक दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल दिनांक ५ ऑगस्ट रोजी धुळे येथे राहणाऱ्या एका प्रवाशी महिलेच्या एक लाख रुपये किमतीच्या मंगळसुत्र चोरीच्या घटनेमुळे यावलच्या बस स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून यावलच्या बसस्थानकावर मागील अनेक दिवसांपासुन वारवांर होणाऱ्या प्रवाशाच्या महागडया वस्तु, मंगळसुत्राच्या चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभुमीवर आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी यावल येथे बसस्थानकावर भेट देऊन प्रवासी सुरक्षेची पाहणी करीत काही महत्वाच्या सुचना यावल एस. टी. आगार प्रमुख दिलीप महाजन यांना दिल्या.

यावलच्या बस स्थानकावर मागील दोन वर्षापासुन प्रवाशांचे सोन्याचे दागिने, महागड्या वस्तु व पैसे चोरी जाण्याच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर तसेच टवाळखोरांकडून विद्यार्थी तरुणींची होणारी छेडखानी वरून होणाऱ्या गंभीर घटना याशिवाय प्रवाशा संदर्भातील आदी विषयाला फैजपुर विभागाच्या विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी आगाराच्या बस स्थानकावर भेट देऊन प्रवाशी सुरक्षा संदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आगार व्यवस्थापनाला बसस्थानकाच्या काही महत्वाच्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सुचना दिल्या. यावेळी आगार व्यवस्थापनाकडून वारंवार पोलीस प्रशासनाकडे मागणी करून देखील बसस्थानकावर अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी करण्यात आली असुन या मागणीकडे आगार व्यवस्थापनाने विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांचे लक्ष वेधले. यावेळी सिंग यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्यासह पोलीस कर्मचारी व यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, आगाराचे वाहतुक लिपीक संदीप पाटील, लिपिक अतुल चौधरी, वरिष्ठ लिपिक महेन्द्र पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content