सिंदखेड राजाजवळ बसला अपघात; १७ जण जखमी

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जालन्याजवळ असणाऱ्या सिंदखेड राजा चौकात मोठा अपघात झाला आहे. सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात सिंदखेड राजाहून नाशिकला जाणा-या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १७ जण जखमी झाले असून यात वृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून जखमींवर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बससमोर येणा-या सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस उलटी फिरून मागे असलेल्या ट्रकवर आदळली.

या धडकेमुळे बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. या अपघातात बसमधील १७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वृद्धांसह महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सिंदखेड राजा चौकात झालेल्या अपघातानंतर बसमधील प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरून बसला हलविण्यात आले.

Protected Content