मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आजच्या काळात बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदी करण्यावर भर देतात. मात्र, या खरेदीत देखील आता फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुंबईत अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने ५५ हजार रुपयांचा मोबाईल ॲमेझॉनवरून मागवला. हे पार्सल जेव्हा घरी आले तेव्हा त्याला धक्का बसला. पार्सल उघडल्यावर त्यात फोन ऐवजी अर्धा डझन चहाचे कप आढळले. याबाबत या युवकाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे.
नागरिक संचालित बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनीतील उप अभियंता असलेले अमर चव्हाण यांनी १३ जुलै रोजी ॲमेझॉनवरून टेक्नो फँटम व्ही फोल्ड मोबाईल फोन मागवला होता. या साठी त्यांनी तब्बल ५४,९९९ रुपये ऑनलाइन भरले. ऑर्डर केलेल्या दोन दिवसानंतर त्यांच्या घरी पार्सल आले. त्यांनी हे पार्सल उघडल्यावर त्यांना फोन ऐवजी चहाचे कप आल्याने त्यांना धक्काच बसला. या प्रकरणी त्यांनी ॲमेझॉन तसेच विक्रेत्या कंपनीशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र, त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर वैतागून चव्हाण यांनी ॲमेझॉन आणि पार्सल देणाऱ्या कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी ॲमझॉन इंडियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.