पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळाले तिसरे पदक; महाराष्ट्रीयन नेमबाज स्वप्नील कुसळेने रचला इतिहास

पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या झोळीत तिसरे पदक आले आहे. भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत मराठमोळ्या स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात प्रथमच भारतीय नेमबाजाने पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक होते. याआधी भारताची शेवटची दोन पदके नेमबाजीतही आली होती.

स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ इतका होता. चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर ४६३.६ होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला. स्वप्नीलपूर्वी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबजोतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.अशा प्रकारे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदकं आली आहे.

Protected Content