महावितरण नागपूर प्रादेशिक विभागाची आढावा बैठक संपन्न

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कंपनीतील प्रत्येकाने नैतिकता आणि नितिमत्ता जपून कार्य केल्यास महावितरण अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी व्यक्त केला. महावितरणच्या काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’कार्यालयात आयोजित नागपूर प्रादेशिक विभागातंर्गत येत असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर, गोंदीया आणि चंद्रपूर या पाचही परिमंडलातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व लेखा अधिका-यांच्या संयुक्त आढावा बैठक प्रसंगी परेश भागवत बोलत होते.

या बैठकीत भागवत यांनी सौर कृषी पंपांसह सर्व प्रकारच्या वीज जोडण्या देण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश देखिल दिले. याशिवाय पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ग्राहकांनी निश्चित शुल्काचा भरणा केल्यानंतर तात्काळ नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही निर्देशही त्यांनी यावेळी दिले. इज ऑफ लिव्हिंग नुसार ग्राहकांना गतीमान सेवा देण्यावर जोर द्यावा, ग्राहकांच्या वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारी, अचूक बिलिंगसह इतरही विविध तक्रारींची दखल घेत त्यांचे तत्परतेने आणि वेळेत निराकरण करण्यासाठी स्थानिक यंत्रणेने अधिक संवेदनशील व सजग राहण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी प्रत्येक महिन्यात सर्व प्रकारच्या वर्गवारीतील ग्राहकांकडून शंभर टक्के वीजबिल वसुली होणे गरजेचे आहे. यासाठी योग्य नियोजन करत वीजबिल वसुलीला प्राधान्य द्यावे, वसुलीत हयगय सहन करण्यात येणार नाही अशा स्पष्ट सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी श्री परेश भागवत यांनी वीजबिल वसुली, बिलींग पॅरामीटर, ऑफ़ ग्रीड सौर कृषी पंप योजना, पीएम सुर्यघर योजना, सुधारित वितरण क्षेत्र योजना, वाहिनी विलगीकरण योजना, वीज हानी कमी करणे, आधुनिकीकरण, नवीन वीज जोडण्या या विषयांचा मंडलनिहाय आढावा घेतला. या बैठकीला मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, पुष्पा चव्हाण, दिलीप दोडके, ज्ञानेश कुळकर्णी, हरिष गजबे यांच्यासह प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, वित्त व लेखा विभागातील अधिकारी व परिक्षेत्र कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Protected Content