नितीश कुमारांची नक्कल केल्यामुळे आरजेडीच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिहार विधान परिषद सदस्य राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते सुनील कुमार सिंह यांना मोठा झटका लागला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नक्कल केल्यामुळे बिहारच्या वरिष्ठ सभागृहातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या विधान परिषदेत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची नक्कल केल्यामुळे एखाद्या नेत्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०२० मध्ये सुनील सिंह यांना विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले होते. त्यांनी १२ फेब्रुवारीला विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि जेडी(यू) प्रमुख नितीश कुमार यांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर नितीश कुमार यांना अपमानित केल्याचा आरोप झाला आणि त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांनी यापूर्वीही अनेक प्रसंगी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला होता. जेडी(यू) नेते रामवचन राय यांच्या नेतृत्वाखालील आचार समितीने प्रभारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांना अहवाल सादर केल्यानंतर सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव वरच्या सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला. सभागृहातील विरोधी पक्षनेत्या (एलओपी) आरजेडीच्या राबडी देवी यांनी या निर्णयाला विरोध केला आणि म्हटले की, परिषदेने सिंह यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. परंतु, अध्यक्षांनी नकार देत सिंह यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक होता.

 

Protected Content