छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सध्या महायुतीकडून विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू असताना त्यांचे मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मात्र महायुतीचे टेन्शन वाढवणारी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असणार आहे. तसेच, येत्या ९ ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना खुले आवाहन देखील केले आहे.
यावेळी बोलतांना बच्चू कडू म्हणाले, ”येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असेल. हे श्रम करून जगतात त्यांची ही आघाडी करून आम्ही लढा लढणार आहोत. 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये आमचा मोर्चा पार पडणार आहे. या मोर्चामध्ये आम्ही आमच्या काही मागण्या सरकारपुढे मांडणार आहोत. दोन ते तीन लाख लोकं या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांची आघाडी आणि तिसरी आघाडी यात नेमका फरक काय याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. तिसरी आघाडी म्हणजे अनेक पक्ष एकत्र येऊन केवळ जागावाटपाची देवाणघेवाण करतात. आमच्या आघाडीत मात्र मुद्द्यांना महत्व असेल. कोणाला किती जागा मिळाल्या याला महत्व नसेल. शेतकऱ्यांची ही आघाडी असणार आहे. आम्ही तिसरी आघाडी असा शब्द वापरणार नाही. कोणाला वापरू देणारीही नाही”, असे बच्चू कडूंनी स्पष्ट केले.
तसेच पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “राज्यात जातीय तेढ वाढू नये यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. मनोज जरांगे यांनी निवडणूक वाढवल्यास काही हरकत नाही. त्यांचा आरक्षणाचा मुद्दा समोर ठेवत ते लढणार आहेत यामध्ये काही वाईट नाही. मात्र आमच्या शेतकऱ्यांच्या आघाडीत मनोज जरांगे यांच्यासाठी दरवाजे उघडे असतील. आम्ही भेदभाव करत नाहीत. शेतकऱ्यांच्या आघाडीत आरक्षणाचा मुद्दा मांडणार का याबाबत 9 तारखेला जाहीर करू”, असे बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे.