सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका व राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने त्यांनी मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण विकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी सुधा मूर्ती यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.

१ ऑगस्ट रोजी आज लोकमान्य टिळक यांची १०४ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सायंकाळी ६ वाजता होणार्‍या सोहळ्यात सुधा मूर्ती यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्‍वस्त यावेळी उपस्थित असतील. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे ४२वे वर्ष आहे. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याच सोहळ्यात टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक यांनी लिहिलेल्या ‘लिजेंडरी लोकमान्य’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रे याचा समावेश या कॉफीटेबल बुकमध्ये आहे.

Protected Content