बेवारस रूग्णाला निर्जनस्थळी सोडले; ससून रूग्णालयातील प्रकार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बेवारस रुग्णाला उपचारानंतर रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार ससून रुग्णालयामध्ये घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरचे रुग्णालय प्रशासनाने निलंबन देखील केले आहे. रुग्णाला रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रात्री दीड वाजताची ही घटना आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टर आदी कुमार यांनी बेवारस रुग्णांवर उपचार करुन निर्जनस्थळी सोडन दिले. हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. त्यानुसार ससूनमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. परंतु दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तपास केला त्यावेळी हा गैरप्रकार समोर आला. रुग्णालयातील या गलथान कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी तपास सुरु केला. सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. ससून रुग्णालयातील डॉ. आदी कुमार यांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर ‘इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी सोडायला सांगितले. ‘नेमके कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असे विचातल्यावर डॉक्टरांनी म्हटलं की तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला 500 रुपये दिले की बरोबर सोडून येतो.

काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार, नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्णाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवले. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content