अत्याधुनिक वैद्यकीय सेवासुविधेमुळे जिल्ह्याच्या विकासात मोठे पाऊल – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरोग्यव्यवस्थेत महत्वाची वैद्यकीय उपकरणे आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे अतिदक्षता विभाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठे पाऊल पडले आहे. यामुळे गरीब, आदिवासी, दुर्गम भागातील रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळणार आहे. गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक आयसीयू व वैद्यकीय उपकरणाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी नवीन तयार झालेल्या अतिदक्षता विभागाविषयी व नवीन उपलब्ध उपकरणांविषयी माहिती दिली.

यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले की, रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने अनेक सुविधांची आवश्यकता भासत होती. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाने रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग आणि जागतिक दर्जाच्या कंपनीची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली आहेत. रुग्णांसाठी आणखी बऱ्याच आरोग्य सुविधांचे प्रस्ताव असून ते देखील पुढील काळात मंजूर होतील असेही डॉ. ठाकूर म्हणाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी विविध विकासकामांचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला. तसेच, आणखी काही समस्या असतील त्या पुढील काळात सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही सांगितले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय चौधरी, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी राजसिंह छाबरा यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले. आभार डॉ.अक्षय सरोदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दिलीप मोराणकर, निलेश बारी, प्रकाश पाटील, मोहन पाटील, विश्वजीत चौधरी, राकेश सोनार, दीपक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content