वेल्डींग काम करता दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरूणाचा मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील आर.के. नगरात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आर. के. नगर परिसरात घडली. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाहिद सादिक शेख (वय २४ रा. सोनार चाळ, अमळनेर) असे मयताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील सोनार चाळ परिसरात शेख शाहिद शेख सादीक हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गेल्या आठवड्यातच कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुलगी बघण्यास गेले होते. शाहिद याची प्रकृती बरी नसल्याने तो घरी आराम करत होता. गुरूवारी ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मोठा भाऊ शाकीर याला पाण्याची बाटली देण्यासाठी शेख शाहिद हा आर.के. नगरात वेल्डींग काम करण्याच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी त्याने भावाला मदत करण्यासाठी त्यानेही वेल्डींगचे काम सुरू केले. त्यात त्याचा तोल जावून खाली पडला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content