गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यासंदर्भात आ. चिमणराव पाटलांनी मंत्री सावंतांची घेतली भेट

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपये वाढ करणे, संपकाळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करणे, या मागण्या मंजूर होणेबाबत मतदारसंघातील कर्मचारी महिलांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेतली होती. या मागणीबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांची आमदार चिमणराव पाटील यांनी भेट घेत या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे ३५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यात आहेत. दि.१४ मार्च, २०२४ रोजी शासन निर्णय क्रमांक: आशा-५६२३/प्र.क्र.५३५/आरोग्य-७ या निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये गटप्रवर्तकांना एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे. सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज झाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहेत. संपादरम्यान आपण गटप्रवर्तकांना ६२००/- रुपये व मा.मुख्यमंत्री महोदयांचा यांच्या सूचनेनुसार त्यात रु.३८००/- ची आणखी भर घालून दहा हजार रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करून शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे.

गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे पंचवीस आशा स्वयंसेविकांवर देखरेख करावी लागते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला २५ दिवस दौरे करून आशांना भेटी देवून त्यांना मार्गदर्शन करावे लागते. त्यांना मिळणारे मानधन हे त्यांच्या प्रवासावर खर्च होते. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यातून रक्कम शिल्लक राहत नाही. तेव्हा गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासह अन्य मागण्या मान्य करून गटप्रवर्तकांच्या न्याय मिळवून देण्याची विनंती यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांचेकडे केली.

Protected Content