जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एम.जे.कॉलेजमध्ये शनिवारी झालेला तरुणाचा खून पार्किंगच्या वादातून नव्हे, तर गँगवॉरमधून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. विशेष म्हणजे ज्या तरुणाचा खून करायचा होता. त्याची ओळख पटविण्यासाठी मारेकरी जमले होते. परंतू त्याच्या ऐवजी प्रतिस्पर्धक गँगचा समर्थक असल्याच्या संशयातून असोद्याच्या तरुणाचा नाहक बळी गेला. त्यामुळे कालच्या घटनेला फक्त पार्किंगचे निमित्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मू.जे. महाविद्यालयात तरुणांमध्ये वाद झाला. यात एका टोळीतील जमावाने दोन भावंडांना बेदम मारहाण करून त्यातील आसोद्याचा विद्यार्थी मुकेश सपकाळे (वय २२) याच्या छातीत चॉपर खुपसून खून केला. शनिवारी दुपारी १ वाजता मू.जे.महाविद्यालयातील दुचाकी पार्किंगमध्ये ही घटना घडली होती. परंतू या घटनेला आता नवीन किनार समोर येत आहे. यानुसार शहरातून दोन टवाळखोर पोरांच्या आपसात काही दिवसांपासून वाद सुरु होते.
गुरुवारी झाले होते मोठे भांडण
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास लॉ-कॉलेजच्या मैदानावर दुपारी दोन गटामध्ये चांगलीच हाणामारी झाली होती. यावेळी जवळपास १५० ते २०० पोरांचा जमाव जमला होता. परंतू वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठी हाणामारी होण्यापासून टळली होती. या हाणामारीत निखील नामक मुलाला किरकोळ लागले होते. यातून डी-मार्ट परिसरात राहणाऱ्या किरण नामक मुलाशी त्याची चांगलीच खुन्नस झाली होती. परंतू नंतर दोघांमध्ये समजोता झाल्याचीही चर्चा होती. दरम्यान, तत्पूर्वी निखीलने काही दिवसांपूर्वी ओंकारेश्वर मंदिराजवळ एका तरुणाला मारले होते. आणि तो तरुण किरणचा मावसभाऊ होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होते.
शनिवारी ओळख आणि रविवारी होता गेम करायचा डाव
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आपल्या मावस भावाला मारल्याच्या रागातून किरण निखीलवर प्रचंड खुन्नस ठेऊन होता.त्याने आपल्या गँगसोबत मिळून निखीलचा गेम करायचा प्लॅन आखला होता. त्यानुसार त्यांना माहिती मिळाली होती की, निखील हा दररोज एम.जे.कॉलेजला येत असतो. म्हणून सर्व जण एम.जे.कॉलेजच्या पार्किंगमध्ये दबा धरून बसले होते. वास्तविक बघता शनिवारी खून करण्याचा प्लॅनच नव्हता. रविवारी मोठी पार्टी करून मग निखीलचा गेम करायचे ठरवले होते. शनिवारी फक्त निखीलला बघून खात्री करायची होती.
गैरसमजातून खून?
शनिवारी दुपारी किरण व त्याची गँग एम.जे. कॉलेजला मद्याच्या नशेत पोहोचल्यानंतर त्यांच्यातील एकाचा वाद नेमका असोदा येथील सपकाळे बंधूंशी झाला. याचवेळी सपकाळे बंधूंपैकी एक निखीलचे मित्र असल्याचा किरणचा गैरसमज झाला. तशात हाणामारी सुरु असतांना एकाने किरणच्या कानशीलात लगावली. आधीच रागाने संतापात असल्याने मग थेट चॉपर काढत वार करायला सुरुवात केली. त्यात मुकेश सपकाळेचा काहीएक संबंध नसतांना नाहक बळी गेला.
निखील दुपारपासून रामानंद पोलीस स्थानकात
गुरुवारी निखील आणि किरणच्या गँगमध्ये गुरुवारी दुपारी लॉ – कॉलेजच्या मैदानावर झालेल्या भांडणाची आधी एनसी नोंदलेली होती. वास्तविक बघता त्याचवेळी गुन्हा दाखल झाला असता. तर किरणला अटक झाली असती. त्यामुळे कदाचित शनिवारी एमजे कॉलेजमधील घटना टळली असती. दरम्यान, रामानंद पोलिसांनी निखीलला आज दुपारी पोलीस स्थानकात बोलावून घेत, गुरुवारच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे कळते. त्यामुळे निखील दुपारपासून रामानंद पोलीस स्थानकात बसून होता.
पोरांचा घोळका घेतोय मारेकऱ्यांचा शोध
मुकेशच्या मृत्यूमुळे संतापात असलेले काही तरुण काल रात्री पासून किरण आणि त्याच्या मित्रांचा शोध घेत फिरत असल्याचे वृत्त आहे. रात्री समता नगर परिसरात देखील काही तरुण घुसले होते. परंतू त्यांना कुणीही मिळून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून संवेदनशील भागात बंदोबस्त लावलेला आहे. तर पोलिसांचे पथक देखील मुकेशच्या इतर मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. तसेच मुंबई, सुरत आदी ठिकाणी पथकं रवाना झाली आहेत.