तांत्रिक अडचणीमुळे एमपीएससीची टंकलेखन परीक्षा रद्द

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यभरातील विद्यार्थ्यांना मुंबई हे एकच परीक्षा केंद्र दिल्याने मुंबईबाहेरून आलेल्या उमेदवारांमध्ये ‘एमपीएससी’ विरोधात प्रचंड संतापाची लाट आहे.

आयोगाने लिपिक-टंकलेखक व करसहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै दरम्यान मुंबई येथील विविध परीक्षा केंद्रांवर होईल असे जाहीर केले. त्यानुसार सकाळी मुंबई येथील परीक्षा केंद्रावर टंकलेखन परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेदरम्यान टंकेलेखन करताना ‘कन्ट्रोल आणि शिप्ट’चे बटन दाबले की संगणक बंद पडत होता. किंवा काही उमेदवारांना परीक्षेतून बाहेर पडावे लागत होते. टीसीएस कंपनीकडे हे काम असून त्यांनी काहीवेळ हा तांत्रिक गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने उमेदवारांचा संताप वाढत गेला. शेवटी ‘एमपीएससी’च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

‘एमपीएससी’तर्फे सप्टेंबर २०२३ मध्ये गट-क सेवा पदाच्या ७ हजार ५१० जागांसाठी जाहिरात देण्यात आली. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर आणि अमरावती अशा सहा केंद्रांवर मुख्य परीक्षा २०२३ घेण्यात आली. यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आयोगाने लिपिक-टंकलेखक व करसहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै दरम्यान केवळ मुंबई येथील विविध परीक्षा केंद्रांवर होईल असे जाहीर केले. त्यामुळे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपासून सर्वच उमेदवारांना मुंबई केंद्रावर जावे लागणार आहे. अनेक उमेदवार दुर्गम भागातील असून बिकट आर्थिक परिस्थितीत परीक्षा देतात. अशा कुठल्याही परस्थितीचा विचार न करता मुंबईला परीक्षा होणार असल्याने त्यांच्यावर मानसिक तसेच आर्थिक ताण आला आहे. त्यात आता १ ते ३ जुलैपर्यंत होणारी परीक्षा तांत्रिक गोंधळाने रद्द झाल्याने या सर्व उमेदवारांची कोंडी झाली आहे.

Protected Content