नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला टप्पा ३ जुलै रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या १३ जागांसाठी १० जुलै रोजी सात राज्यांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत प्रतिष्ठेची पोटनिवडणूक होत असून तेथे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर देहरामधून निवडणूक लढवत आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत अभिषेक मनू सिंघवी (काँग्रेस) यांचा पराभव झाला होता. भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर दोन अपक्षांनी राजीनामा दिल्याने हमीरपूर आणि नालागढ जागांसाठीही मतदान होणार आहे. भाजपने तिघांनाही पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे. विधानसभेच्या या पोटनिवडणुका विद्यमान सदस्याच्या मृत्युमुळे किंवा आमदाराने राजीनामा दिल्याने रिक्त जागांवर होत आहेत. काही आमदारही खासदार झाले आहेत. त्यांनी राजीनामे दिले. या पोटनिवडणुका बिहार (१), हिमाचल प्रदेश (३), मध्य प्रदेश (१), पंजाब (१), तामिळनाडू (१), उत्तराखंड (२) आणि पश्चिम बंगाल (४) अशा होणार आहेत.