मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली झाली आहे. रोकडे अनेक सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांविरोधातील खटल्यांचे न्यायाधीश होते. शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन, भोसरी भुखंड घोटाळा या प्रकरणाचे खटले रोकडे यांच्या काळात अंतिम टप्प्यात होते. असे असताना त्यांची बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश राहुल रोकडे शिखर बँक घोटाळा प्रकरणी 12 जुलैला सुनावणी घेणार होते. याच दरम्यान रोकडे यांची दिंडोशी येथील सत्र न्यायालयात बदली झाली आहे.
न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नुकतंच एका सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका प्रकरणात 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना वॉरंटचा इशाराही दिला होता. विशेष म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी अजित पवारांना क्लिन चिट दिली आहे. पण त्याविरोधात ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. याच प्रकरणी आता येत्या 12 जुलैला सुनावणी होणार होती. पण त्याआधीच न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे.
न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोरील सर्वात महत्त्वाचा खटला म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरण. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंदेखील नाव आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधातील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा यांचादेखील समावेश होता. आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्या प्रकरणी तसेच ते आरोपी असलेल्या भोसरी भुखंड घोटाळ्या प्रकरणाचा खटलादेखील सुरु होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील प्रकरणही सुरू होता. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधातील हनुमान चालिका प्रकरणाचा खटलाही अद्याप प्रलंबित होता.