बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जामखेड येथून अटक केली आहे. व्हायरल ऑडिओ प्रकरणी खांडेविरोधात परळी शहर आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबतही वक्तव्य केले होते.
व्हायरल ऑडियो क्लिपनंतर आज शिवसेनेकडून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल कुंडलिक खांडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान व्हायरल क्लिपप्रकरणी खांडे हे चर्चेत आले होते.आज सकाळी त्यांना मारहाणीच्या गुन्ह्यात अटकही करण्यात आली आहे. त्यांना आज बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याआधीही गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कुंडलिक खांडेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. आज कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी काढले आहे. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात, धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याचा भाषा आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल एकेरी वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंवर शिवसेनेने कारवाई करत शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.