Home राज्य बिबटयाच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलगा ठार

बिबटयाच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलगा ठार


छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कन्नड तालुक्यातील भाबंरवाडी गावातील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. या तरुणावर बिबट्याने हल्ला करत त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरपटत नेऊन ठार केल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. ऋषिकेश विलास राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाबंरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्या आहेत. त्या ऋषिकेशच्या घरी जेवायला आल्या होत्या. रात्री जेवण झाल्यानंतर ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईंना सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. यावेळी आनंद महाराज देखील नियमितप्रमाणे फिरायला गेले होते. त्यामुळे महाराज येईपर्यंत थांब असे त्यांच्या आईने ऋषिकेशला सांगितले. तेवढ्यात लघुशंकेसाठी गेलेला ऋषिकेश बराच वेळ परतला नाही.

यानंतर महाराज येताच त्यांनी ऋषिकेशच्या घरी कळवले. कटुंबाने रात्रभर शोध घेतल्यानंतर त्याचा शोध लागला नाही. सकाळी शोधल्यावर ओढत नेल्याच्या खुणांवरून ऋषिकेश आढळून आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र सुर्यवंशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार, धीरज चव्हाण, रवींद्र ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याने हल्ला तरुणाचा जीव घेतल्याने भांबरवाडी गावावर शोककळा पसरली असून शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पुन्हा बिबट्याने कोणावर हल्ला करू नये यासाठी तात्काळ त्या बिबट्यास पकडून अभयारण्यात सोडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Protected Content

Play sound