शेतातील काम करण्यावरून भाऊ व वहिनीकडून तरूणाला मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेतात काम करत नसल्याचे बोलून भावासह वहिनीने दिराला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील जामोद गावात रविवार १६ जून रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ जून रोजी रात्री १० वाजता भाऊ व वहिनीवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील जामोद गावात कृष्णा सुरेश सोनवणे (वय-३४) हा तरुण वास्तव्यास आहे. कृष्णा व त्याचा भाऊ रिंकू यांची सामाईक शेती आहे. रविवार १६ जून रोजी रिंकू सोनवणे याने भावाला तु शेतात काम करीत नाही, आम्हीच काम करतो असे म्हणत त्याच्यासोबत वाद घातला. त्यांच्यातील वाद वाढतच असल्याने रिंकू याच्यासह त्याच्या पत्नीने कृष्णाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी संतापाच्या भरात रिंकू सोनवणे याने त्याच्या हातातील लांकडी दांडक्याने कृष्णाच्या हातावर मारुन त्याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, सोमवारी २४ जून रोजी रात्री १० वाजता कृष्णा सोनवणे याने जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरुन रिंकू सुरेश सोनवणे व वंदना रिंकू सोनवणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.

Protected Content