मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बुधवारी संध्याकाळी ऐरोली येथे पाच जणांच्या टोळक्याने विनाकारण एका रिक्षाचालकाला मारहाण केली. त्याचा बचाव करणाऱ्यावर चाकूने वार करून जखमी केले. एवढ्यावर हे टोळके थांबले नाही तर त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये घुसून मोडतोड केली. यावेळी एक लॅपटॉप आणि एक मोबाईल चोरी झाला. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नित्या भाई, बाबा राठोड,आणि त्याचा मेव्हणा, तसेच प्रवीण राठोड उर्फ नेत्या, असे यातील आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी सतीश जाधव हे संध्याकाळी पाचच्या सुमारास गणपती पाडा येथिल हॉटेल त्रिमूर्ती येथे एका रिक्षाचालकाशी बोलत होते. त्यावेळी हे टोळके कुठूनतरी अचानक आले आणि त्यांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण सुरू केली. तसेच रिक्षावरती दगडफेक करून रिक्षाचे नुकसान केले. त्यावेळी फिर्यादी सतीश जाधव हे त्यांना अडविण्यासाठी गेले असता नित्या भाईने जाधव यांच्यावर चाकूने हल्ला करत कपाळावर वार केला. त्यात ते जखमी झाले.
टोळक्याने त्रिमूर्ती बारमध्ये घुसून बारमधील टेबल, खुर्ची तोडून नुकसाने केले. तसेच डीजे वादक याची डीजे मशीन तोडली व त्यांच्या ताब्यातील लॅपटॉप जबरीने हिसकावून घेतला. यातील नित्या, बाबा आणि त्याच्या मेव्हण्याने बारमधील ग्राहकांना चाकूचा धाक दाखवत मध्ये पडू नका अन्यथा जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व ग्राहक पळून गेले. त्यातील एक ग्राहक समीर सुळे यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा त्रिमूर्ती बारच्या बाजूस असलेल्या लिपिका रेसीडन्सी लॉजिंगमध्ये वळवला. इथे घसून दगडफेक करून काचेचा मुख्य दरवाजा व इतर साहित्य तोडून नुकसान केले व लॉजमधील एका कामगाराला मारहाण करून पळून गेले. याबाबत सतीश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.