अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या (पूर्वीचा फैजाबाद) लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत आहे. या जागेवर समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद आघाडीवर आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
फैजाबाद हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. सुरुवातीच्या काळात काँग्रेसनं इथं सलग चार वेळा विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर कधीही या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाला सलग विजय मिळालेला नाही. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने २०१४ आणि २०१९ साली पहिल्यांदा हा मतदारसंघ सलग दोनदा जिंकला. यावेळी हॅटट्रिक करण्याची संधी भाजपला होती.
अयोध्येत राममंदिराच्या उभारणीमुळे पुन्हा एकदा ती संधी मिळेल अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र, ती हुकण्याची शक्यता आहे. भाजपकडून या जागेवर लल्लू सिंह हे निवडणूक लढवत आहेत. येथे काँग्रेस व सपाच्या आघाडीचे उमेदवार अवधेश प्रसाद मैदानात आहेत. आतापर्यंत मतमोजणीच्या २६ फेऱ्या पार पडल्या असून त्यात समाजवादी पक्षाने आघाडी घेतली आहे. प्रसाद यांना २० हजारांहून अधिक मतांची आघाडी आहे. ही आघाडी मोडून विजय मिळवणं भाजपच्या उमेदवारासाठी जवळपास अशक्य मानलं जात आहे.
राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जातीय समीकरण आणि अयोध्येच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं जमीन संपादित करण्यात आलं, त्यामुळं लोकांमध्ये नाराजी होती. यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उठवलेला आरक्षण आणि संविधान बदलाचा मुद्दा प्रचारात चालला. याशिवाय कमकुवत झालेला बहुजन समाज पक्ष आणि या पक्षाची मतपेढी इंडिया आघाडीकडं वळवण्यात सपा व काँग्रेसला आलेलं अपयश याचा फटका भाजपला पडल्याचे दिसत आहे.
दुसरं सर्वात मोठे कारण म्हणजे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत यश न मिळालेल्या काँग्रेस आणि सपा युतीने यावेळी लोकसभा निवडणुकीत एकजुटीनं काम केले. त्यामुळं मुस्लिम मतं एकगठ्ठा इंडिया आघाडीच्या बाजूनं गेली. त्याच वेळी, ज्याच्या जोरावर भाजपला विजय मिळत होता, त्या आधारे हिंदू मतांचं विभाजन करण्यात भारत आघाडी यशस्वी ठरली. बसपची दलित मतं, ओबीसी, ब्राह्मण आणि ठाकूर मतदारांची नाराजी हे देखील इंडिया आघाडीच्या यशाचं कारण मानलं जात आहे. याशिवाय महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दाही लोकांना महत्त्वाचा वाटल्याचं दिसत आहे.