मुंबई-वृत्तसेवा | राज्याचे माजी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी अतिशय चुरशीच्या लढतीत पराभूत केल्याने त्यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
ख्यातनाम विधीज्ज्ञ उज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री वर्षा गायकवाड या रिंगणात होत्या. हा मुकाबला अतिशय चुरशीचा झाला. यात पहिल्या टप्प्यात वर्षा गायकवाड यांना आघाडी मिळाली होती. यानंतर मात्र निकम यांनी सातत्याने आघाडी घेतली.
शेवटच्या टप्प्यात तर ही लढत अजून मोठ्या चुरशीची झाली. यात प्रत्येक क्षणाला विजयाचे पारडे दोन्ही बाजूंनी झुकत होते. शेवटी वर्षा गायकवाड यांनी सुमारे चार हजार चारशे मतांनी उज्वल निकम यांना पराभूत केले आहे. भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.