शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रथम वर्ष व व्दितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे प्रथम वर्षव थेट व्दितीय वर्षपदविका अभियांत्रिकी प्रवेषासाठी सुविधा केंद्र क्रमांक १००९ दिनांक २९ मे २०२४ पासून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू झालेले आहे. सदर प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने दिनांक २५ जुन २०२४ पर्यंत चालणार आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटवर भरावयाचे आहे. ऑनलाईन पध्दतीमध्ये ई-स्कृटीनी व फिजिकल-स्कृटीनी असे दोन पर्याय आहेत. विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी ई-स्कृटीनी चा पर्याय विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. फिजिकल-स्कृटीनी या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फार्म भरल्यानंतर प्रिंट घेऊन सुविधा केंद्रात स्वतः उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कॅप गुणवत्तेसाठी आणि कॅपव्दारे प्रवेशासाठी विचारात घेतले जाईल. प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अनिवार्य आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज फि रू ४००/- असून राखीव प्रवर्गासाठी प्रवेश अर्ज फि रू ३००/- ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.

शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी व अणुविद्युत अभियांत्रिकीच्या प्रत्येकी ६० जागा असून यंत्र अभियांत्रिकी १२० जागा अशा नियमित ३६० जागा, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व शिक्षण शुल्क माफी योजनेतील कोटयातुन ५४ म्हणजे एकूण ४१४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत विहित मुदतीत प्रवेश अर्ज सुविधा केंद्र येथे सादर करावा. प्रथम वर्षाच्या अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया प्रभारी अधिकारी प्रा. समीर कुळकर्णी मोबाईल क्र. ९८२३७१२४८६ व डॉ. प्रशांत सरोदे मोबाईल क्र. ८६०५३२००८२ आणि थेट व्दितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रा अरुण काकड मोबाईल क्र. ९४२३४३०८१४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी केलेले आहे.

Protected Content